यवत, ता. २२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अवमानकारक टिप्पणी केल्याचा धक्कादायक प्रकार भांडगाव (ता. दौंड) येथे उघडकीस आला आहे. फेसबुकवरील कथित कमेंटचा स्क्रीनशॉट आणि रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधाकर मुकुंद बोरकर (वय ५९, रा. भांडगाव, ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी निता अनिल गायकवाड (वय ४६, रा. भांडगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निता गायकवाड या १८ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास घरी असताना मोबाईलवर इंस्टाग्रामवरील रिल्स पाहत होत्या. त्यावेळी “याला शोधा लवकर, याचा सत्कार करा” अशा आशयाच्या रिल्समध्ये त्यांच्या गावातील सुधाकर बोरकर याने त्याच्या ‘बोरकर महाराज’ या फेसबुक आयडीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक कमेंट केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ही बाब त्यांनी मुलगा तेजस गायकवाड याला दाखविल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्या गावातीलच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी गावात सुधाकर बोरकर दिसल्यानंतर फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि काही नागरिकांनी त्याला या कमेंटबाबत जाब विचारला.
सुरुवातीला बोरकर याने अशी कोणतीही कमेंट केली नसल्याचे सांगितले. मात्र, नंतर संबंधित फेसबुक अकाउंटवरून कमेंट केल्याची कबुली दिल्याचा दावा फिर्यादींनी केला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला यवत पोलीस ठाण्यात आणून तक्रार दाखल केली.
दरम्यान, संबंधित कमेंटमुळे समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे भांडगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. यवत पोलिसांनी सुधाकर मुकुंद बोरकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू.







