नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत (New Delhi) झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, केंद्र सरकारने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले. तपासात अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. या तपासामुळे राष्ट्रीय राजधानीत होणारा मोठा हल्ला टळला आहे. मुझम्मिलशी संबंधित दोन खोल्यांमधून जवळपास 2900 किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटक साहित्य जप्त केले असून अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या आहेत. विद्यापीठाच्या मशिदीचे मौलवी मोहम्मद इस्तक यांच्या घरातूनही 358 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते.

अल-फलाह विद्यापीठातील 3 डॉक्टर रडारवर
विद्यापीठातील तीन वैद्यकीय प्राध्यापक दहशतवादी कटात सामील असल्याचे समोर आले आहे. यात डॉ. उमर उन नबी, डॉ. मुझम्मिल अहमद गनाई आणि डॉ. शाहीन सईद यांचा समावेश आहे. हे तिघेही वैद्यकीय (MBBS) विद्यार्थ्यांना सकाळी शिकवायचे आणि रात्री दहशतवादी कट रचायचे.
या प्रकरणी डॉ. मुझम्मिल आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आली असून यांचा संबंध पाकिस्तान-आधारित जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना महत्वाची माहिती पुरवत होते. गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या ‘उकासा’ नावाच्या हँडलरने हे संपूर्ण षड्यंत्र रचल्याचा संशय आहे.
विद्यापीठाने दोन डॉक्टरांना अटक केल्यानंतर कुलगुरूंनी स्पष्ट केले की, नोकरीपलीकडे आरोपींशी विद्यापीठाचा कोणताही संबंध नाही. विद्यापीठ तपासामध्ये पूर्ण सहकार्य करत असून दहशतवादी कृत्यांचा जाहीरपणे निषेध करत आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






