लोणी काळभोर, ता. ४ : लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरातील माळीमळा येथे सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी (ता. ३) रात्री रात्री बारा वाजण्याच्या सुमारास धाड टाकून एका आरोपीला अटक केली. या कारवाईत आरोपीकडून ४७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सयाजी वामन पवार (वय ५१, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल राजाराम कर्डिले यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक लोणी काळभोर परिसरात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत राजेंद्र पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, माळीमळा परिसरात एक व्यक्ती गांजा विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खातरजमा करून आवश्यक परवानगी घेतल्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव सयाजी वामन पवार असल्याचे सांगितले.
एनडीपीएस कायद्याच्या कलम ५०(१) नुसार आरोपीला त्याचे कायदेशीर अधिकार समजावून सांगण्यात आले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत त्याची अंगझडती घेण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशात पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाची पुडी आढळली. तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याच्या साहाय्याने वजन केले असता ४७ ग्रॅम गांजा (पिशवीसह) आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत २,८२० रुपये असून, पंचनामा करून तो पुराव्यासाठी जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी सयाजी वामन पवार याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत. ही कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, पोलीस हवालदार निलेश कोल्हे पोलीस अंमलदार राहुल कर्डिले, शिवाजी दरेकर, सागर कदम व त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे.






