पुणे: पुण्यातील नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणातील आरोपी महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दोघांचा इतर आरोपींसोबत समान हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

या प्रकरणात तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांना एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन पुण्यात येण्यास सांगण्यात आले होते. त्यांच्या परिचयातील व्यक्तीच्या माध्यमातून ही रक्कम नऱ्हे येथील बँकेत जमा करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार 18 जुलै रोजी हर्षवर्धन पवार पुण्यात आले.

प्रवासादरम्यान त्यांच्या वाहनाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. स्वतःला पोलीस असल्याचे सांगत त्यांनी वाहनाची झडती घेण्याच्या नावाखाली पैशांच्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. झटापटीदरम्यान हर्षवर्धन पवार यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यात आली. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर पोलीस चौकीत नेण्यात आले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी सुट्टीवर असतानाही महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री उपस्थित होते. त्यांनी स्वतःला पत्रकार सांगणाऱ्या आशिष तिवारीची बाजू घेत व्यावसायिकाला धमकावल्याचा आरोप आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. हरवलेली काही रक्कमही त्यानंतर परत मिळाल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वतःला पत्रकार सांगणाऱ्या आशिष तिवारीला अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींनाही अटक झाली आहे. मात्र प्रमिला निकम, अजित मेस्त्री यांच्यासह काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा इतर संशयितांशी समान उद्देश दिसून येत असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.






