मावळ: राज्यात आज तिथीनुसार (Maval News) आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे. मात्र, याच मंगलदिनी पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किल्ले विसापूरवरून शिवज्योत घेऊन उत्साहाने निघालेल्या शिंदेवाडीच्या दोन तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदर मावळमधील शिंदेवाडी येथील शिवभक्त दरवर्षीप्रमाणे मोठ्या श्रद्धेने किल्ले विसापूर येथे शिवज्योत नेण्यासाठी गेले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे हे तरुण शिवज्योत घेऊन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून आपल्या गावाकडे येत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने तरुणांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
ज्या गावात शिवजयंतीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवज्योतीचे स्वागत करण्याची तयारी सुरू होती, तिथे पहाटे अपघाताची बातमी कळली. ऐन उत्सवाच्या दिवशी दोन उमद्या तरुणांचे प्राण गेल्याने संपूर्ण आंदर मावळ परिसरात शोककळा पसरली आहे.







