न्हावरे: खोकल्याचे औषध समजून चुकून तणनाशक औषध प्राशन केल्याने एका ३४ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यात घडली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शिरूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अर्चना विठ्ठल गायकवाड (वय ३४,रा. गायकवाडवस्ती,न्हावरे,ता.शिरूर, जि.पुणे)असे मृत महिलेचे नाव आहे.रविवारी (दि.२८जून)सकाळी आपल्या राहत्या घरासमोरील पडवीमध्ये त्यांनी खोकल्याचे औषध असल्याचा समज करून चुकून तणनाशक औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने शिरूर येथील चोरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

मात्र,उपचार सुरू असतानाच सकाळी सुमारे पावणे दहा वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.याप्रकरणी पती विठ्ठल शिवाजी गायकवाड(वय ३९,व्यवसाय शेती, रा.गायकवाडवस्ती, न्हावरे, ता.शिरूर,जि.पुणे)यांनी दिलेल्या खबरवरून शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास न्हावरे पोलीस करीत आहेत.






