हडपसर, ता. 21 : भाड्याने गाडी घेण्याच्या (Manjari News) बहाण्याने एका व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून त्याची चारचाकी कार भाड्यानी घेऊन तिची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चैतन्य विजय वाघमोडे (वय 29, धंदा व्यापार, घुले नगर लेन नं. 04, स्वागत हॉटेल जवळ, मांजरी बु, पुणे) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर मयूर लोंढे, रा. हडपसर, पुणे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य वाघमोडे यांनी आपली कार भाड्याने देण्यासाठी ‘जस्ट डायल’वर नोंदणी केली होती. 19 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी मयुर लोंढे याने त्यांना फोन करून 3000 रुपये प्रतिदिन दराने गाडी भाड्याने घेतली. सुरुवातीला काही दिवस त्याने नियमित पैसे पाठवून वाघमोडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी पुन्हा ‘8 ते 10 दिवसांसाठी गाडी हवी आहे’ असे सांगून त्याने 10 हजार रुपये रोख आणि 10 हजार फोन-पे द्वारे देऊन गाडी नेली.
12 डिसेंबरनंतर आरोपीने भाड्याचे पैसे देणे बंद केले आणि फोन उचलणेही टाळले. 2 जानेवारी 2026 रोजी गाडीचे लोकेशन सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे दिसले. वाघमोडे आपल्या मित्रांसह तिथे पोहोचले असता, गाडी बालाजी थोरात नावाच्या व्यक्तीकडे असल्याचे समजले. तिथे सागर ढवळे आणि मयुर लोंढे यांच्याशी वाघमोडे यांचा मोठा वाद झाला. वाघमोडे यांनी 112 नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावले, मात्र तरीही त्यांना आपली गाडी मिळवता आली नाही. काही वेळातच आरोपींनी गाडीचे ‘जीपीएस’ लोकेशन बंद करून गाडी गायब केली.
दरम्यान, तपासादरम्यान मयुर लोंढे आणि सागर ढवळे यांनी फिर्यादीची कोणतीही संमती नसताना लहु ढवळे व सतीश कदम यांना ही गाडी विकली होती. त्यासाठी त्यांनी बनावट नोटरी कागदपत्रे तयार केली होती. उलट, आरोपी लहु ढवळे यानेच वाघमोडे यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन फसवणुकीचा बनाव रचला. आपली गाडी आणि लाखो रुपयांचे भाडे बुडाल्याने अखेर चैतन्य वाघमोडे यांनी मांजरी आणि टेंभुर्णी पोलिसांत धाव घेऊन सविस्तर जबाब नोंदवला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.







