पुणे: गणेशोत्सव जवळ आल्याने शहरात मिठाई, पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त किंवा संशयास्पद खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यात करण्यात आलेल्या विशेष कारवाईत तब्बल 12,500 किलो पनीर आणि सुमारे 11 लाख रुपये किमतीचा संशयित खवा जप्त करण्यात आला.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार एफडीएच्या पथकाने पुण्यातील बुधवार पेठ परिसरात तपासणी मोहीम राबवली.

या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेला पनीर आणि खवा पथकाच्या निदर्शनास आला. प्राथमिक माहितीनुसार, पनीरचा साठा कर्नाटकातून पुण्यात आणण्यात आला होता. तर खवा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून शहरात आणल्याचे तपासात समोर आले आहे.

जप्त केलेल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच या मालाची खरेदी कुठून करण्यात आली, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का आणि या साठ्यामागे नेमका पुरवठादार कोण आहे, याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, जप्त केलेल्या खव्यापैकी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणारा सुमारे 4.5 टन साठा नष्ट करण्यात आला. हा खवा हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथील पुणे महापालिकेच्या कचरा हस्तांतरण केंद्रात नेण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करून भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.







