लोणी काळभोर, ता. 8 : आरोग्यास घातक असलेल्या हातभट्टी दारूची विक्री होत असलेल्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी 490 लिटर दारूसह 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी ही कामगिरी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरात असलेल्या मोगले वस्तीच्या कॅनॉलजवळ मंगळवारी (ता.7) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शिवाजी सुभाष फंड (वय 27) आणि सागर प्रकाश काळभोर (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर काळभोर यांच्या पत्र्याच्या घरामध्ये एक इसम सागर काळभोर याच्या हातभट्टीची तयार दारू कॅन्ड भरली असून लोकांना विक्रीसाठी ठेवली आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला, तेव्हा पत्र्याच्या बांधकाम केलेल्या घरासमोर दोन लोक संशयित रित्या थांबलेले दिसले. पोलीसांची चाहुल लागल्याने गावठी हातभट्टीची दारु विकत घेणारे दोन इसम त्या ठिकाणावरुन पळुन गेले. तर पोलिसांनी घटनास्थळावरून शिवाजी फंड आणि सागर काळभोर या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी सदर ठिकाणची पहाणी केली असता, प्लॅस्टिकच्या प्रत्येकी 35 लिटरच्या एकुण 83 निळ्या व काळ्या रंगाच्या कॅन्डपैकी 14 कॅन्ड दारूने भरलेली आढळून आले. तसेच त्यांनी गावठी हातभट्टीची दारु इसम नामे आलताफ अख्तर उर्फ अली रा. श्रीगोंदा आष्टी जि.अहिल्यानगर याच्याकडून विकत आणल्याचे सांगितले. पोलिसांनी या छाप्यात 490 लिटर दारू 300 लिटरचा प्लास्टिक बॅरल असा एकूण सुमारे 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पंचासमक्ष नमुने जप्त करून उर्वरित दारू नष्ट केली.
तपासादरम्यान ही दारू बाहेरून मागवून स्थानिक पातळीवर विक्री केली जात असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275 तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई), 66, 86 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अरुण जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, महेश करे, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार प्रवीण धडस, अशोक गिरी, सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
गावठी दारू, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांमुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. संबंधितांवर थेट कठोर कारवाई केली जाणार आहे. या पुढील काळातही अशीच कडक मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच “कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. नागरिकांनीही अशा अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी,”
-राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)







