लोणी काळभोर, ता. 24: प्रेमविवाह (Loni Kalbhor News) केल्याच्या वादातून एकावर धारदार शस्त्र डोक्यात मारुन खून करण्याचा प्रयत्न तर दोघांना दगड व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली होती. ही घटना थेऊर (ता. हवेली) येथे शनिवारी (ता.22) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील 6 आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली होती. तर एक आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. परंतु, लोणी काळभोर पोलिसांनी फरार झाल्लेल्या आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

राज दादा शितोळे (वय-22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शितोळेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी रोशन दिलीप चव्हाण, दिलीप पंडीत चव्हाण, आईनाबाई दिलीप चव्हाण, पुजा शेखर चव्हाण, मनिषा दादा शितोळे, उज्वला बाळु सावंत (सर्व रा. चव्हाणवस्ती, थेऊर, ता. हवेली) यांना पोलिसांनी याअगोदर अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण चव्हाण यांचा मुलगा राहुल व आईनाबाई चव्हाण यांची नात साक्षी यांचा प्रेमविवाह झाला आहे. या प्रेमविवाहामुळे दोन्ही कुटुंबामध्ये नेहमी वादविवाद होत होते. या प्रेमविवाहाच्याच वादातून आरोपींनी अरुण छबु चव्हाण, (वय-४०) व त्यांची मुले अर्जुन व पुनम यांना धारदार शस्त्राने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी व आज यांना जिवतचं सोडत नाही, आज याचा कार्यक्रम करून टाकतो असे म्हणून फिर्यादी यांच्या कुटुंबाला धमकी दिली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कायदा 2023 चे कलम 109 (1), 118 (2), 189 (2). 189 (4), 189 (1), 115(2) आर्म अॅक्ट कलम 4(25), महाराष्ट पोलीस अॅक्ट 37 (1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी 6 आरोपींना अवघ्या 12 तासाच्या आत अटक केली आहे. परंतु, आरोपी राज दादा शितोळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर होते. अखेर पोलिसांच्या पथकाने आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
दरम्यान, आरोपी राज शितोळे याला ताब्यात घेतल्यानंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.







