लोणी काळभोर, ता. 17 : महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या (Loni Kalbhor News ) दर्शनासाठी गेलेल्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात घडली असून रविवारी (ता.15) संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब लोणी काळभोर परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलीने सातवीतूनच शिक्षण सोडले होते. रविवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने “मंदिरात जाऊन येते” असे सांगून ती घरातून बाहेर पडली. मात्र संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही.
अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी परिसरात शोध घेतला, मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांकडे चौकशी केली; मात्र कुठेही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचंतरी आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करत आहेत.







