लोणी काळभोर, ता. 21 : जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांच्या टोळक्याने घरात घुसून आजी-आजोबांसह नातवावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (ता. 21) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राममळा परिसरात घडली.

सुरेश मेमाणे, त्यांची पत्नी शारदा मेमाणे आणि नातू आदित्य मेमाणे अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य मेमाणे आणि हल्लेखोर एकमेकांच्या परिचयाचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून चार जणांचे टोळके शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आदित्यच्या घरी पोहोचले. त्यानंतर घरात घुसून त्यांनी आदित्यवर हल्ला चढविला. यावेळी एका आरोपीने आदित्यच्या डोक्यात कोयत्याने वार केला.
नातवाला मारहाण होत असल्याचे पाहून आजोबा सुरेश मेमाणे यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही सोडले नाही. त्यांना दगडाने मारहाण करण्यात आली. तर आजी शारदा मेमाणे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घरातून आरडाओरडा ऐकू आल्यानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित गोरे, पोलिस हवालदार प्रदीप पवार, पोलिस अंमलदार निखील मेमाणे, पुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
पोलिसांनी तिन्ही जखमींना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात सुरेश मेमाणे यांचा हात फ्रॅक्चर झाला असून आदित्यच्या डोक्याला कोयत्याच्या वारामुळे गंभीर दुखापत झाली आहे. शारदा मेमाणे यांनाही मारहाणीत दुखापत झाली आहे. तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पसार झालेल्या चारही आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.






