लोणी काळभोर, ता. 17 : पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या (Loni Kalbhor News) एका चिकनच्या दुकानातच कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात घडली असून, सोमवारी (ता.16) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Breaking News)

विराजुल हायातुल्ला शेख (वय-25, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ काळभोर (वय-27, रा. बाजार मळा, लोणी काळभोर, ता. हवेली)यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराजुल शेख हा पुणे पोल्ट्री चिकन सेंटरमध्ये काम करीत होता. शेख हा दुकानातच वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत अचानक आढळून आला. या घटनेची माहिती त्वरित लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने विराजुल शेख याला लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, शेख याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सायंकाळी सात वाजता घोषित केले.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी शेख याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर विराजुल शेख याच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. तरीही विराजुल शेख याने आत्महत्या का केली? त्या दृष्टीने पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.







