लोणी काळभोर, ता. 8: शॉपचे नुतनीकरण करण्यासाठी घेतलेल्या 5 लाखांच्या मोबदल्यात खाजगी सावकाराने व्याजाच्या मोबदल्यात 21 लाख रुपये उकळून, महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून छेडछाड केल्याची घटना घडली होती. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सन 2020 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत घडली होती. या गुन्ह्यातील फरार झालेल्या दोन्ही आरोपींना लोणी काळभोर (Loni kalbhor News) पोलिसांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथून मंगळवारी (ता.7) अटक केली आहे.

राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) व विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 47 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या विवाहित असून त्या कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. त्यांना त्यांच्या शॉपचे नुतनीकरण करायचे होते. त्यासाठी त्यांनी राहुल काळभोर यांच्याकडून 5 लाख 8 हजार रुपये सन 2020 मध्ये उधार स्वरुपात घेतले होते. परंतु, आरोपी याने तुम्हाला 4 टक्के व्याजाने परतफेड करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर राहुल काळभोर याने फिर्यादी यांच्याकडून दिलेल्या रक्कमेपोटी वेळोवळी एकुण 21 लाख रुपये व्याज स्वरुपात उकळले आहे.
दरम्यान, राहुल काळभोर याने 21 लाख रुपये घेऊनसुद्धा फिर्यादी यांना आणखी पैशाची मागणी करुन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला. राहुल काळभोर व त्याचा मित्र विशाल काळभोर हे दोघे फिर्यादी यांच्या शॉपवर 8 ऑगस्ट 2025 रोजी आले. त्यांनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी राहुल काळभोर याने पिडीतेशी अश्लील बोलुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126 (2 ), 351 (2 ) (3 ).,352 , 79, 3 (5 ) महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 अनुसुचित जाती व जमाती अधिनियम कलम 3(1)(R), 3(1)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी राहुल काळभोर व विशाल काळभोर हे फरार झाले होते. आरोपी दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होते. मात्र पोलिसांचे एक पथक आरोपींच्या कायम मागावर होते. लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाला दोन्ही आरोपी हे उरुळी कांचन येथे आहेत. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संतोष राठोड, अण्णा माने, रामहरी वणवे, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले, प्रवीण धडस, योगेश पाटील, शैलेश कुदळे, सुरज कुंभार, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे, बाजीराव वीर व त्यांच्या पथकाने केली आहे.







