लोणी काळभोर, ता. १३ : मंदिरात गोंधळ घालणाऱ्या मुलांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका ६९ वर्षीय महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत महिलेचे पती तसेच नातींनाही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शकुंतला पोपट शेलार (वय ६९, लोणी काळभोर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर स्नेहल प्रणित गायकवाड, प्रणित गायकवाड, अनिकेत कांबळे, प्रिया उजागरे, अनिता शिंदे आणि निलम काळभोर (सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शकुंतला व त्यांचे पती हे बौद्धवस्ती येथील महालक्ष्मी मंदिरात पूजा-अर्चेचे कामकाज ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पाहत होत्या. यावेळी मंदिरात काही लहान मुले गोंधळ घालत असल्याने पोपट शेलार यांनी त्यांना मंदिराबाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी स्नेहल गायकवाड तेथे आली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिने पोपट शेलार यांना शिवीगाळ केली.

शकुंतला शेलार यांनी शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यानंतर स्नेहल गायकवाड हिने तिचा भाऊ अनिकेत कांबळे, पती प्रणित गायकवाड, भावजय अनिता शिंदे आणि निलम काळभोर यांना बोलावून घेतले. त्यानंतर संबंधितांनी शकुंतला शेलार व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.प्रणित गायकवाड व अनिकेत कांबळे यांनी पोपट शेलार यांना हातापायांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी नात अंकिता गायकवाड व श्रृतीका शेलार मध्ये आल्या असता प्रिया उजागरे हिने त्यांचे केस पकडले, तर अनिता शिंदे व निलम काळभोर यांनी त्यांना हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी शकुंतला शेलार पुढे गेल्या असता स्नेहल गायकवाड हिने हातातील लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर संबंधित सर्वजण तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर मुलगा घटनास्थळी आल्यानंतर शकुंतला शेलार यांना घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. पोलिसांनी उपचारासाठी यादी दिल्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना वॉर्ड क्रमांक २१ मध्ये उपचारासाठी दाखल करून घेतले. या प्रकरणी शकुंतला शेलार यांनी स्नेहल गायकवाड, प्रणित गायकवाड, अनिकेत कांबळे, प्रिया उजागरे, अनिता शिंदे आणि निलम काळभोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.






