पुणे : शेअर बाजारातील ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत धायरीतील ५१ वर्षीय व्यक्तीची ३२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ‘फिनसोल सारथी प्लॅन’, ‘फिनसोल सारथी ॲप’ आणि ‘३३८ एफएस कोअर अलायन्स’ या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकार घडला. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश विलासराव कुलकर्णी (वय ५१, रा. मंत्रा पार्क व्ह्यू, धायरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ९ जुलै ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कुलकर्णी यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘फिनसोल सारथी प्लॅन’, ‘फिनसोल सारथी ॲप’ तसेच ‘३३८ एफएस कोअर अलायन्स’ या व्हॉट्सॲप ग्रुपशी संपर्क आला. या ग्रुपमधील व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधून शेअर बाजारातील ट्रेडिंगमधून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. एका परदेशी क्रमांकावरूनही त्यांच्याशी संपर्क करण्यात आला.

आरोपींनी विश्वास संपादन केल्यानंतर कुलकर्णी यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी एकूण ३२ लाख ३० हजार रुपये भरले. त्यानंतर संबंधित ॲपवर त्यांच्या गुंतवणुकीवर ९ लाख ६ हजार ३४८ रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले.
हा नफा काढण्यासाठी आणखी २० टक्के सर्व्हिस चार्ज भरावा लागेल, असे आरोपींनी सांगितले. त्यामुळे कुलकर्णी यांना संशय आला. त्यांनी गुंतवलेले पैसे परत मागितले; मात्र आरोपींनी रक्कम परत न करता त्यांची ३२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) राऊत करत आहेत.






