लोणी काळभोर, ता.7 : जिल्हा परिषद व पंचायत (Loni Kalbhor News) समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळच्या सत्रात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र दुपारच्या तीव्र उन्हामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावला. सायंकाळी पुन्हा नागरिकांनी मतदान केंद्रांकडे गर्दी केली. लोणी काळभोर जिल्हा परिषद गट तसेच कदमवाकवस्ती व लोणी काळभोर पंचायत समिती गणात एकूण 58. 24 टक्के मतदान झाले, तर थेऊर जिल्हा परिषद गटात 75.68 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आता मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून उमेदवारांचे भवितव्य सोमवारी होणाऱ्या मतमोजणीवर ठरणार आहे.

कदमवाकवस्ती पंचायत समिती गणात 35 हजार 616 मतदारांपैकी 19 हजार 998 नागरिकांनी मतदानाचा हक्क बाजविला असून या गणात 56. 15 टक्के मतदान झाले आहे. तर लोणी काळभोर वडकी पंचायत समिती गणात 15 हजार 720 मतदारांपैकी 9484 मतदानाचा हक्क बाजविला असून या गणात 60 . 33 टक्के मतदान झाले आहे. असे एकूण या गणात 58. 24 टक्के मतदान झाले आहे. तर थेऊर पंचायत समिती गणात 17 हजार 230 मतदारांपैकी 13 हजार 264 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून या गणात 77. 42 टक्के मतदान झाले आहे. तर थेऊर-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटात 75.68 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मतदानादरम्यान लोणी काळभोर गटात दोन ठिकाणी वादग्रस्त प्रकार घडले. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथील मतदान केंद्रावर एका व्यक्तीने त्याचे मतदान आधीच कुणीतरी केल्याचा आरोप केला आहे. तर लोणी काळभोर गावात एका तरुण मतदाराला ईव्हीएमवरील बटण दाबले जात नसल्याचा त्रास सहन करावा लागला. संबंधित कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत अडचण दूर केली. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.
कमी मतदानामुळे निकालाची दिशा अनिश्चित बनली असून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणत्या उमेदवाराला फायदा होणार आणि कोणाचा खेळ बिघडणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. आता संपूर्ण परिसराचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, या निकालातूनच स्थानिक राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. परंतु, सध्याअपेक्षेपेक्षा कमी मतदानामुळे सर्वच पक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर व थेऊर परिसरातील निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कमी-जास्त मतदानाची टक्केवारी, चौरंगी लढतीचे समीकरण आणि प्रमुख पक्षांच्या प्रतिष्ठेचा सवाल यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. आता सर्वांच्या नजरा सोमवारी (ता. ९) होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या असून, मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लोणी काळभोर गणात शिवसेना कोणाच्या विजयाचा फुगा फोडणार?
लोणी काळभोर-वडकी पंचायत समिती गणात यंदा चौरंगी लढत रंगली आहे. राष्ट्रवादीकडून रेश्मा काळभोर, भाजपकडून श्वेता काळभोर, शिवसेनेकडून नंदिनी कोळपे तर अपक्ष म्हणून विद्या गायकवाड रिंगणात उतरल्या आहेत. या गणात तुलनेने कमी मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः शिवसेनेच्या उमेदवार नंदिनी कोळपे या कोणाच्या विजयाचा फुगा फोडणार, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.
थेऊर पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे पारडे जड
थेऊर पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोग्यदूत युवराज काकडे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सातत्याने केलेली आरोग्य विषयक सामाजिक मदत हा त्यांच्या प्रचाराचा मोठा प्लस पॉईंट ठरला आहे. आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांसाठी केलेल्या कामांची दखल मतदारांनी घेतल्याचे दिसून येत असून त्यामुळे या गटात राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करत आहेत.
मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त
मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्यासह 300 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांवर चोख पहारा दिला. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.







