लोणी काळभोर, ता. 11 : पूर्व हवेलीतील नागरिकांच्या नागरी समस्यांचा पाढा थेट जनता दरबारात वाचण्यात आला. वीजपुरवठ्यातील अडचणी, हडपसर–यवत उन्नत मार्गासाठी होणारे भूसंपादन आणि रेल्वे प्रकल्पाशी संबंधित प्रश्नांनी या जनता दरबाराचे लक्ष वेधले. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत, “माझी नाळ जनतेशी जोडलेली आहे. सर्व प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन,” अशी ग्वाही शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी दिली.

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे आमदार कटके यांच्या वतीने रविवारी (ता. 11) जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील नागरिकांनी विविध नागरी समस्या आणि प्रलंबित प्रश्न मांडत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवणे हा आपला अधिकार असून, प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कटके यांनी सांगितले.

हडपसर ते यवतदरम्यान प्रस्तावित उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा मुद्दा जनता दरबारात ऐरणीवर आला. या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. जमीन संपादन करताना जमीनमालकांचे प्रश्न, मोबदला आणि भूसंपादन प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाशी संबंधित प्रश्नही यावेळी मांडण्यात आले. हडपसर ते उरुळी कांचन येथील शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. बाधित जमीनमालकांच्या अडचणींचे निराकरण होणे आणि त्यांना नियमानुसार योग्य मोबदला मिळणे महत्त्वाचे असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पूर्व हवेलीतील वळती, उरुळी कांचन, तरडे यांसह विविध गावांमध्ये वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला. शेती, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनासाठी वीज महत्त्वाची असल्याने या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावर आमदार कटके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत, यापुढे वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न केले जातील आणि विजेचा प्रश्न लवकर सोडविला जाईल, अशी ग्वाही दिली. पूर्व हवेलीतील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची वेळेत सोडवणूक करावी, अशी अपेक्षा या जनता दरबारातून व्यक्त झाली.
यावेळी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे ,लोणी काळभोर माजी सरपंच नागेश काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, साधना बँकेचे संचालक बापूसाहेब बोरकर, विठ्ठल काळभोर, युवराज काळभोर, सतिश काळभोर, संजय काळभोर, नबाजी रुपनवर, सुहास चौधरी, किरण कुंजीर, निळकंठ काळे, संतोष घोलप व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीक्षेत्र थेऊरचा कचरा प्रकल्प अन्यत्र हलवा – युवराज काकडे
अष्टविनायकांपैकी मानाचे स्थान असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर येथे प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी हवेलीचे सभापती युवराज काकडे यांनीआमदार कटके यांच्याकडे केली आहे. थेऊर येथे अष्टविनायकांपैकी दुसरे स्थान असलेले श्री चिंतामणी गणपती देवस्थान आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तीर्थक्षेत्राला दरवर्षी सुमारे 20 ते 25 लाख भाविक भेट देतात. तसेच गावाची लोकसंख्या सुमारे 20 हजार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी आमदारांना निवेदन देऊन प्रकल्पाच्या जागेची फेरतपासणी करण्याची मागणी केली.







