लोणी काळभोर, ता. १९ : मांजरी बुद्रुक (ता. हवेली) गावठाण परिसरातून १५ वर्षीय विद्यार्थी घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून, मुलाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

कार्तीक रविंद्र चौगुले (वय १५) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र शंकर चौगुले (वय ४२, रा. चिंतामणी प्रांगण, दत्त मंदिरामागे, मांजरी गावठाण, मांजरी बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधातअपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र चौगुले हे विमाननगर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. चौगुले यांचा मुलगा कार्तीक चौगुले हा के. के. घुले हायस्कूल, मांजरी बुद्रुक येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. १७ जून रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता वडिलांनी कार्तीकला झोपेतून उठवून शाळेत जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने उठून पाहिले असता घराचा दरवाजा उघडा होता आणि कार्तीक घरात नसल्याचे निदर्शनास आले.
प्राथमिकतः तो शाळेत गेला असावा, असे वाटल्याने कुटुंबीयांनी शाळेत तसेच परिसरात शोध घेतला. मात्र, शेजाऱ्यांनी कार्तीक हातात बॅग घेऊन जाताना पाहिल्याचे सांगितले. घरी तपासणी केली असता त्याचे काही कपडेही घरात नसल्याचे आढळून आले. गेल्या दोन दिवसांपासून नातेवाईक, मित्रपरिवार तसेच मांजरी व शेवाळेवाडी परिसरात शोध घेऊनही कार्तीकचा काहीच मागमूस लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी अखेर मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
बेपत्ता मुलाचे वर्णन असे : कार्तीक हा दिसायला सावळा वर्ण, उंची सुमारे ४.७ फूट, निळ्या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची पँट, सोबत बॅग असून तो मराठी भाषा बोलतो. या वर्णनाचा मुलगा आढळ्यास त्यांनी मांजरी पोलिसांची संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक टोणे यांनी केले आहे.







