सासवड, ता. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोपवण्यात आलेली कायदेशीर कर्तव्ये पार पाडण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका शिक्षकावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक कामाकडे दुर्लक्ष करणे आणि वारंवार बैठकींना गैरहजर राहणे या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आनंद महादेव बंडगर, शिक्षक, ए.सी. हुंडकरी, अहिल्यादेवी माध्यमीक शाळा जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पुरंदरच्या नायब तहसीलदार (निवडणूक विभाग) श्रीमती शुभांगी नारायण गोंजारे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी येथील अहिल्यादेवी माध्यमिक शाळेतील शिक्षक आनंद बंडगर यांची नियुक्ती सप्टेंबर 2025 पासून मतदान केंद्र क्रमांक 229 साठी ‘मतदान केंद्रस्तरीय अधिकारी’ (BLO) म्हणून करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी बीएलओ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, आरोपी आनंद बंडगर यांनी आपल्याला सोपवलेले हे कायदेशीर कर्तव्य जाणूनबुजून पार पाडले नाही.
यासंदर्भात तहसील कार्यालयाने आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकींनाही ते वारंवार गैरहजर राहिले. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी आपल्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, शासकीय आदेशाचे उल्लंघन आणि निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सासवड पोलिसांनी 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.







