बारामती: बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील (Lakshman Hake) पोटनिवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संबंधित सदस्यांच्या (Baramati Politics) अकाली निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. विशेषतः बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेला विरोध दर्शवला आहे. बारामतीत पवार कुटुंबीयांव्यतिरिक्त अन्य उमेदवार उभा राहावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेत पाठवण्याचा पर्याय सुचवत त्यांनी “आम्ही ही निवडणूक लढवू आणि जिंकून दाखवू” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
बारामती ही पारंपरिकदृष्ट्या पवार कुटुंबीयांची बालेकिल्ला मानली जाते. त्यामुळे येथे निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा सुरू होती. मात्र हाके यांच्या भूमिकेमुळे या समीकरणात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. “मीच उमेदवार असेन असे नाही, स्थानिक कार्यकर्त्यांनाही संधी दिली जाऊ शकते,” असे सांगत त्यांनी ही लढत केवळ वैयक्तिक नसून राजकीय पर्याय निर्माण करण्याची असल्याचे सूचित केले.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणातही राजकीय घडामोडी वेगाने बदलताना दिसत आहेत. हाके यांनी सरकारच्या धोरणांविरोधात ही निवडणूक लढवण्याचा मुद्दाही पुढे केला आहे.
या घडामोडींमुळे बारामतीतील निवडणूक सरळसोट न राहता चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारंपरिक राजकारणाला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो का, की पवार कुटुंबीयांची पकड कायम राहते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.







