मुंबई: विधानसभेच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान (Ajit Pawar Plane Crash) अपघाताबाबत चर्चा व्हावी, यासाठी विरोधकांकडून सातत्याने मागणी (Rohit Pawar) केली जात असताना अद्यापही या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होत नसल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत, हा मुद्दा सभागृहात येण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे. (Maharashtra Politics)

रोहित पवार यांनी सांगितले की, त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा घेण्याची मागणी केली आहे. अध्यक्षांनी उद्या किंवा सोमवारी चर्चा घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात काय घडते, याकडे लक्ष ठेवावे लागेल, असे त्यांनी म्हटले. या अपघाताबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या प्रकरणात ‘VSR’ कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत, यामागे “कोणीतरी मोठी व्यक्ती” असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला. याच मुद्द्यावर इतर नेते, जसे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, यांनीही चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
“आमच्याकडे काही महत्त्वाची माहिती आहे. सरकारने योग्य पावले उचलली नाहीत, तर ती माहिती सार्वजनिक करू,” असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. सत्तेत असतानाही संबंधितांना न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
28 जानेवारी रोजी झालेल्या या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला. मात्र या घटनेनंतर अपघाताची कारणे, तपासाची दिशा आणि संबंधित अहवालांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणावर सभागृहात सविस्तर चर्चा होऊन सत्य बाहेर येण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.







