उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ‘स्वामी समर्थ स्विमिंग टँक’मध्ये व्यवस्थापनाच्या अघोरी आणि भोंगळ कारभारामुळे एका 13 वर्षांच्या निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला. याबाबत उरुळी कांचन पोलिसांनी स्विमिंग पूलचे मालक शुभम सुरेश काकड आणि सुरेश काकडेसह कोचविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत महेश तुकाराम गायकवाड (वय 41, व्यवसाय- बँक सिक्युरिटी गार्ड, हिंगणगाव, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम सुरेश काकडे (स्विमिंग टँक मालक), सुरेश काकडे (पूर्ण नाव माहीत नाही), व स्विमिंग टँकचे कोच (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या तिघांवर 106(1) (निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरणे) आणि 3(5) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यश महेश गायकवाड (वय -13 वर्ष, 4 महिने) असे बुडून मृत्तू झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 10) फिर्यादी महेश गायकवाड हे आपल्या मुलाला (यश) कोरेगाव मूळ येथील ‘स्वामी समर्थ स्विमिंग टँक’ येथे पोहणे शिकवण्यासाठी घेऊन आले होते. तेथील रजिस्टरला नाव नोंदवून 100 रुपये फी भरून त्यांनी यशला पोहण्यासाठी सोडले. यशचा पोहण्याचा पहिलाच दिवस असल्याने वडिलांनी तिथे हजर असलेल्या कोचला “माझ्या मुलाला पोहता येत नाही, त्याच्यावर नीट लक्ष ठेवा,” असे सांगितले होते. त्यानंतर कोचने यशच्या कमरेला प्लास्टिकचे कॅन बांधले आणि त्याला पाण्यात सोडले. वडील बाजूच्या शेडमध्ये थांबले होते.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वडील मुलाला पाहण्यासाठी गेले असता तो पोहत होता. मात्र, अवघ्या 10 मिनिटांनी ते पुन्हा पाहण्यास गेले, तेव्हा यश पाण्यात कुठेच दिसला नाही. घाबरलेल्या वडिलांनी तात्काळ तेथील कोच आणि स्विमिंग पूलचा मालक शुभम सुरेश काकडे यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी “तो बाथरूममध्ये कपडे चेंज करायला गेला असेल.” असे सांगीतले.

वडिलांनी बाथरूम, चेंजिंग रूम आणि संपूर्ण परिसर शोधला, पण यश कुठेच सापडला नाही. अखेर संशय आल्याने तिथे पोहणाऱ्या एका दुसऱ्या मुलाने पाण्यात बुडी मारून शोध घेतला असता, यश हा स्विमिंग पूलच्या तळाशी पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ बाहेर काढून पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
दरम्यान, शासकीय नियमांनुसार कोणत्याही व्यावसायिक स्विमिंग टँकवर प्रशिक्षित ‘लाइफगार्ड’, पोहता न येणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक साधनसामग्री आणि संपूर्ण टँकवर लक्ष ठेवणारे ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ असणे बंधनकारक आहे. मात्र, मालक शुभम काकडे आणि त्याच्या व्यवस्थापनाने या सर्व नियमांना केराची टोपली दाखवली होती. सुरक्षेची कोणतीही साधने नसल्याने इतर मुलांचाही जीव जाऊ शकतो, याची स्पष्ट जाणीव असताना केवळ पैशांच्या हव्यासापोटी निष्काळजीपणा करून बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.







