मुळशी : पुण्यातील मुळशी तालुक्यातील लवळे फाटा परिसरात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रकने समोरून जाणाऱ्या एका डंपरसह दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास लवळे फाटा परिसरातील उतारावरून एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर अनियंत्रित झालेला ट्रक उतारावरून वेगाने खाली आला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या डंपरला तसेच दोन दुचाकींना धडकला. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मुळशी परिसरातील रुग्णालयात तसेच जवळच्या सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







