लोणी काळभोर, ता. 20 : पूर्व हवेली परिसरात व्यावसायिक (Haveli News) गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराने पुन्हा डोके वर काढले असून, घरगुती सिलेंडरचा गैरवापर करून चारपट दराने सिलेंडर विक्री करणारी टोळी सक्रीय झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रशासन व गॅस कंपन्यांच्या कथित निष्क्रियतेमुळे ही टोळी खुलेआम धंदा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून केला जात आहे.

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान शेकडो मंगल कार्यालये आणि हजारो लहान-मोठी हॉटेल्स आहेत. मार्चच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलेंडरची किंमत सुमारे 1700 ते 1730 रुपये होती. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि पुरवठा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने व्यावसायिक सिलेंडर वितरणावर निर्बंध आणल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही दलालांनी काळाबाजाराचे जाळे उभे केल्याचे बोलले जात आहे.
मागील वीस दिवसांपासून पूर्व हवेलीतील काही भागांत व्यावसायिक सिलेंडर 6 ते 7 हजार रुपये दराने विकले जात असल्याची माहिती समोर येत आहे. ही टोळी विशेषतः मंगल कार्यालये, मोठी हॉटेल्स आणि केटरिंग व्यावसायिकांना लक्ष्य करून थेट संपर्क साधत असून मोठ्या दराने सिलेंडरचा पुरवठा करत असल्याचे सांगितले जाते. अधिकृत पुरवठा बंद असतानाही परिसरातील एकही मोठे हॉटेल किंवा मंगल कार्यालय बंद पडलेले नसल्याने काळाबाजार किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, याची प्रचिती येत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे घरगुती सिलेंडरचे व्यावसायिक सिलेंडरमध्ये रूपांतर करून विक्री केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे नियमबाह्य असून यामुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच शासनाच्या अनुदानाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे.
“इतक्या मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असताना गॅस कंपन्या, पुरवठा विभाग आणि पोलिस प्रशासनाला याची कल्पना नाही का?” काहींनी तर या टोळीच्या मागे प्रभावशाली व्यक्तींचा वरदहस्त असल्याचा थेट आरोप केला आहे. पूर्व हवेलीतील सामाजिक व व्यावसायिक संघटनांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा, तसेच संबंधित गॅस एजन्सी आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने संयुक्त पथक तयार करून गॅस गोदामे, हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांवर छापे टाकावेत, अन्यथा सर्वसामान्य ग्राहक व लहान व्यावसायिकांवर अन्याय सुरूच राहील, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.






