पुणे: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात (Purandar News) लाचखोरीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला असून मंडळ कृषी अधिकारी अमोल सुतार यांच्याविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली आहे. शेतकऱ्याला अनुदान मिळवून देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून त्यापैकी 3,000 रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. (Pune Crime)

या प्रकरणाची सुरुवात एका शेतकऱ्याच्या तक्रारीतून झाली. संबंधित शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदीसाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज केला होता. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी अमोल सुतार यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. शेतकऱ्याने याबाबत 29 डिसेंबर 2025 रोजी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 29 डिसेंबर 2025 रोजीच सापळा रचण्यात आला. यामध्ये अमोल सुतार यांनी शेतकऱ्याकडून 3,000 रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे ग्रामीण भागातील सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतून पुन्हा एकदा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठीच जर लाच द्यावी लागत असेल, तर या योजनांचा उद्देशच प्रश्नचिन्हात येतो. विशेष म्हणजे, कृषी विभागासारख्या शेतकऱ्यांशी थेट संबंधित विभागात असे प्रकार घडणे अधिक चिंताजनक मानले जात आहे.







