पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सोमवारी एक मोठी कारवाई केली आहे. सासवड येथून दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेडकर (वय २८) या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. दिगंबर हा शिरूर, सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांत फरार होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी आणि आर्म ॲक्ट अंतर्गत अनेक गुन्हे नोंद आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिगंबरने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी एका व्यक्तीला ट्रान्सफॉर्मर बंद केला नाही म्हणून मारहाण केली होती. त्यानंतर ९ मार्च २०२६ रोजी त्याने सोनोरी येथील हॉटेल चालकास धमकी देऊन ३२ हजार रुपये लुटले आणि यापूर्वी अडीच लाख रुपयांची खंडणीही उकळली होती. इतकेच नाही तर, १९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा येथे क्रिकेट ग्राउंडवर बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात त्याने पिस्तुल काढून गोळीबार केला होता आणि तो पसार झाला होता.

दिगंबर हा अत्यंत चलाख गुन्हेगार असून, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो सातत्याने वेशांतर करत होता आणि आपल्या राहण्याच्या जागा बदलत होता. त्याच्यावर राजगड, जेजुरी, सासवड आणि शिरूर पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, मोक्का अशा स्वरूपाचे एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या टोळ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळताच पुणे ग्रामीण एटीएसचे पथक त्याच्या मागावर होते. पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून त्याला जेरबंद केले. सध्या तो कोणाच्या मदतीने फरार होता आणि त्याचे आणखी कोणाशी लागेबांधे आहेत, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
ही कामगिरी सदर कामगिरी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.संदिपसिंह गिल्ल तसेच पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार व बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक श्री.गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, विशाल गव्हाणे व पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे यांचे पथकाने केलेली आहे.






