लोणी काळभोर, ता. २४ : हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि महावितरण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर थेऊर एजी, नायगाव एजी आणि हिंगणगाव एजी या तिन्ही फिडरवरील १२ गावांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असतानाच, रिव्हरव्ह्यू सिटी प्रकल्पासाठी प्रस्तावित ३३ केव्ही भूमिगत उच्चदाब वीजवाहिनीला थेऊर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शविला आहे.

यासंदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांना निवेदन देत संबंधित काम तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित वीजवाहिनी शेतजमिनी व वस्तीमधून नेण्याचा विचार सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची भीती आहे. तसेच मोबदल्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. भविष्यात उच्चदाब वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी थेऊर उपकेंद्रावर आधीच मोठा वीजभार असल्याचे नमूद केले आहे. रिव्हरव्ह्यू सिटीसारख्या मोठ्या प्रकल्पाला येथून वीजपुरवठा दिल्यास स्थानिक ग्राहक, शेतकरी आणि कृषी फिडरवरील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कमी दाबाचा पुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि शेतीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पर्यायी उपकेंद्र किंवा अन्य मार्गाचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) ९ डिसेंबर २०२७ रोजी दिलेल्या पत्राद्वारे लोणीकंद-थेऊर फाटा राज्य मार्ग क्रमांक ११६ च्या कडेला विद्युत वाहिनी टाकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संबंधित रस्त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून न्यायालयाने रस्त्याचे काम केवळ अस्तित्वातील ५.५० मीटर रुंदीमध्येच करण्याचे निर्देश दिले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे इतर कोणत्याही कामास परवानगी देणे योग्य ठरणार नसल्याचे पीडब्ल्यूडीने स्पष्ट केले आहे.
“तांत्रिक अहवाल जाहीर करा, सार्वजनिक सुनावणी घ्या”
कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी संपूर्ण तांत्रिक अहवाल सार्वजनिक करावा, स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या हरकती ऐकून सार्वजनिक सुनावणी घ्यावी आणि तोपर्यंत सर्व कामे स्थगित ठेवावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष करून काम सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, थेऊर, नायगाव आणि हिंगणगाव एजी फिडरमधून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वीजपुरवठा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत असून, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम सध्या थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत बोलताना हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे म्हणाले, “थेऊर, नायगाव आणि हिंगणगाव एजी फिडरवरील शेतकऱ्यांना दिवसातील अवघे चार तास वीज मिळत होती. त्यांना जास्त वेळ वीज मिळावी यासाठी आम्ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे कोणतेही काम सहन केले जाणार नाही. गरज पडल्यास आंदोलन करण्यासही आम्ही मागे-पुढे पाहणार नाही. अगोदर शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा द्या, त्यानंतरच मोठ्या प्रकल्पांना वीज द्या,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.






