उरुळी कांचन, (पुणे) : घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून अचानक खाली कोसळल्यामुळे एका 4 वर्षीय निष्पाप चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात रविवारी (ता. 14) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अर्णव नानासाहेब देशमुख (वय – 4)असे अपघाती निधन झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. या आघातामुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, उरुळी कांचन परिसरात शोककळा पसरली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार पूनम चांदगुडे यांनी दिलेल्या माहितीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.14) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास चिमुरडा अर्णव देशमुख हा दत्तवाडी येथील आपल्या राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर खेळत होता. खेळत असताना अचानक खिडकीतून त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली सिमेंटच्या जमिनीवर कोसळला.
या भीषण अपघातात अर्णवच्या डोक्याला आणि शरीराला अत्यंत गंभीर मार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुलाचे वडील नानासाहेब देशमुख (वय-38) यांनी तात्काळ धाव घेऊन अर्णवला प्रथमोपचारासाठी उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अर्णवची प्रकृती अत्यंत चिंताजनक आणि तो बेशुद्ध असल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्याला तातडीने पुढील कडक उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हॉस्पिटलच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांचे पथक अर्णवचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. 15) दुपारी बारा वाजता विश्वराज हॉस्पिटलच्या सोनाली डोईफोडे यांनी अर्णव देशमुख याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, 15 जून रोजी घडली असताना, याची अधिकृत नोंद उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तब्बल 8 दिवसांनंतर, म्हणजेच मंगळवारी (ता. 23) दुपारी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार रवींद्र गोसावी हे करत आहेत.






