लोणीकंद, ता. २४ : शिरसवडी (ता. हवेली) येथील वाडेबोल्हाई-राहू रस्त्यालगत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावरून विनापरवाना डिझेलची वाहतूक व साठवणूक केल्याचा प्रकार २२ जून रोजी सायंकाळी उघडकीस आला आहे. लोणीकंद पोलिसांनी ६ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पेट्रोलपंप व्यवस्थापक आणि पिकअप वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोलपंप व्यवस्थापक रोहन रविंद्र सणस (रा. चंदननगर) आणि वाहन मालक सत्यवान हेमचंद्र सातव (रा. वाघोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रद्धा दत्तात्रय टेकवडे (वय ३३) यांनी सरकारतर्फे लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पेट्रोल व डिझेलचा काळाबाजार, साठेबाजी आणि अनधिकृत विक्री रोखण्यासाठी जिल्हास्तरीय पथक तपासणी करत होते. शिरसवडी येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर महिंद्रा पिकअप (एमएच-१२ एसएक्स-०१७६) मध्ये प्लास्टिकच्या बॅरलमध्ये डिझेल भरले जात असल्याचे निदर्शनास आले.

तपासणीदरम्यान संबंधित वाहन सत्यवान सातव यांचे असल्याचे समोर आले. वाहनातील बॅरलमध्ये भरलेले डिझेल कंपनीच्या कामासाठी नेत असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, डिझेल वाहतूक व विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याची कबुली त्याने दिली. यावेळी पेट्रोलपंप व्यवस्थापक रोहन सणस यांनी अशा प्रकारे डिझेल देत असल्याचे सांगितल्याने पथकाने लोणीकंद पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.
घटनास्थळावरून सहा बॅरलमध्ये भरलेले १,२०० लिटर डिझेल, तीन रिकामे बॅरल आणि महिंद्रा पिकअप असा एकूण ६ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पेट्रोलपंप व्यवस्थापक रोहन सणस आणि वाहन मालक सत्यवान सातव यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






