पुणे: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात रोज नवे धागेदोरे समोर येत असून पुणे ग्रामीण पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची चौकशी सुरू असून, घटनास्थळावरील पुरावे, डिजिटल माहिती आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे. तपास पुढे जात असताना काही धक्कादायक दावेही समोर येत आहेत.

तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, घटना घडण्यापूर्वी आरोपींनी इंटरनेटवर विविध माहिती सर्च केल्याचा संशय आहे. केतनचा मृत्यू अपघातासारखा कसा भासेल किंवा घटना कशी घडवता येईल, यासंदर्भात ऑनलाइन सर्च केल्याचा दावा केला जात आहे. तसेच लोहगड किल्ल्यावर अशी जागा निवडण्यात आली होती, जिथून घडलेली घटना अपघात वाटू शकते, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे. मात्र, या दाव्यांना पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपींनी केतनला किल्ल्यावरून ढकलण्यापूर्वी सराव केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. पुढील योजना अधिक काळजीपूर्वक आखण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून तपास सुरू आहे.
दरम्यान, तपास अधिक मजबूत करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने लोहगड किल्ल्यावर सीन रिक्रिएशन केले. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या उपस्थितीत घटनास्थळाची पुन्हा पाहणी करण्यात आली. तेथून रक्त, त्वचा आणि इतर जैविक नमुने गोळा करण्यात आले आहेत.






