अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : पिंपळे खालसा येथे घडलेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिसांनी आता गावागावांतील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चोरीच्या घटनांचा तपास करण्यासोबतच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला आहे.
याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पिंपळे धुमाळ आणि हिवरे कुंभार येथे ग्रामस्थांच्या बैठका घेऊन सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले असून या बैठकांमध्ये गावातील चोरी तसेच अन्य गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे, ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे आणि गावातील प्रमुख चौक, रस्ते व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपळे धुमाळ येथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ग्रामसुरक्षा यंत्रणेचे शुल्क जागेवरच जमा करून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली तसेच गावातील दानशूर व्यक्तींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

येत्या दोन दिवसांत कॅमेरे बसविण्याचे काम सुरू होणार असून ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांना लाठ्या, शिट्ट्या आणि टी-शर्ट उपलब्ध करून देण्याबाबतही ग्रामस्थांनी सहमती दर्शविली तर हिवरे कुंभार येथे ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्व सांगताना नागरिकांना घराच्या सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
अनेक नागरिक शेतामध्ये किंवा रस्त्यालगत लाखो रुपये खर्च करून बंगले उभारतात मात्र घराच्या सुरक्षेसाठी १५ ते २० हजार रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे दुर्लक्ष करतात घराच्या बांधकामासाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च करण्याची तयारी असताना घर आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काही हजार रुपये खर्च करणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे २४ तास पहारा देणारा सुरक्षारक्षक असून चोरी किंवा अन्य अनुचित घटना घडल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचे ठरते.
त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
पिंपळे खालसा येथील चोरीच्या घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी उचललेले हे पाऊल गावागावांतील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. पोलिसांचे मार्गदर्शन ग्रामसुरक्षा दलाची सक्रियता आणि ग्रामस्थांचा सहभाग यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरक्षिततेचे मजबूत जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
नागरिक हेच पोलिसांचे खरे मदतगार
गावाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे २४ तास पहारा देणारा सुरक्षारक्षक असून प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत ग्रामसुरक्षा दल, सीसीटीव्ही यंत्रणा आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे चोरीसह विविध गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध घालण्यास मोठी मदत होते.
नागरिक हेच पोलिसांचे खरे मदतगार आहेत. ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर






