पुणे : दिवाळीतील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला नरक चतुर्दशीचा सण यंदा 8 नोव्हेंबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची विशेष परंपरा आहे. दिवाळीच्या उत्सवात या स्नानाला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान आणि यमदीपदानाचा मुहूर्त जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजून 47 मिनिटांनी चतुर्दशी तिथी सुरू होईल. तर 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी तिची समाप्ती होणार आहे. उदय तिथीचा विचार करता रविवारी 8 नोव्हेंबरला हा सण साजरा केला जाईल.
या दिवशी अभ्यंगस्नानासाठी सकाळी 5 वाजून 34 मिनिटांपासून ते 6 वाजून 33 मिनिटांपर्यंतचा वेळ शुभ मानला जात आहे. या काळात तेल लावून स्नान करण्याची परंपरा आहे.

नरक चतुर्दशी का साजरी केली जाते?
पौराणिक कथेनुसार, नरकासुर नावाच्या असुराने देवतांसह अनेक राजांना त्रास दिला होता. त्याने 16 हजार राजकन्यांना कैद करून ठेवले होते. त्याच्या वाढत्या अत्याचारांमुळे सर्वजण चिंतेत होते. अखेर भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून या राजकन्यांची सुटका केली.

या विजयाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशी साजरी केली जाते, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला रूप चतुर्दशी असेही म्हटले जाते.
यमदीपदानाचा मुहूर्त?
नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानासोबत यमदीपदानालाही विशेष महत्त्व आहे. संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 20 मिनिटांपर्यंत यमदीपदान करता येईल.
या वेळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावून यमदेवाचे स्मरण केले जाते. काही ठिकाणी चार वातींचा दिवा प्रज्वलित करून दीपदान करण्याची प्रथा आहे. तसेच स्नानाच्या वेळी आघाड्याची पाने आणि मातीचा गोळा अंगावरून तीन वेळा फिरवण्याची परंपराही पाळली जाते. अशा प्रकारे अभ्यंगस्नान, धार्मिक विधी आणि दीपदान करून नरक चतुर्दशीचा सण भक्तिभावाने साजरा केला जातो.







