पुणे, ता. ७ : पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध दारू व्यवसायाविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत वर्षभरापासून फरार असलेल्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, कोंढव्यात अवैध देशी दारू विक्रेत्याला पकडण्यात आले आहे. तर वानवडी परिसरात दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या तरुणाकडून तब्बल ४ लाख ४३ हजार रुपये किमतीचा ८ किलो ८६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

फैजु कादर शेख (वय ५३, रा. कमेला, कोंढवा) इम्रान तनवीर शेख (वय २९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) व अल्ताफ ऊर्फ अयाज अकबर शेख (वय १९, रा. न्यू म्हाडा कॉलनी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेट. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व त्यांच्या पथकाने कोंढवा परिसरात गस्त ३ नोव्हेंबर रोजी सुरू केली होती. यावेळी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस कायद्याच्या गुन्ह्यात सुमारे वर्षभरापासून फरार असलेला इम्रान शेख हा घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर कोंढवा येथील कमेला परिसरात स्लेटर हाऊसच्या भिंतीलगत पिंपळाच्या झाडाखाली देशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून फैजु शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ हजार ११० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वानवडी येथील नवीन म्हाडा इमारत, गोसावी वस्ती परिसरात दोन संशयित तरुण दुचाकीवरून निळ्या रंगाच्या बॅगेत अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुचाकी अडवली. यावेळी अल्ताफ ऊर्फ अयाज शेख (वय १९, रा. न्यू म्हाडा कॉलनी, हडपसर) याला पकडण्यात आले. त्याच्या बॅगेची तसेच दुचाकीच्या डिक्कीची झडती घेतली असता ८ किलो ८६० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत ४ लाख ४३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईकपोलीस अंमलदार योगेश कुंभार, सतीश चव्हाण, शरद धांडे, सुमित यादव, विनोद निंभोरे, अमोल जगताप, प्रशांत कळसकर, म. पोलीस हवालदार सुरेखा साबळे, आरती दिवेकर, सुकेशिनी आंबले तसेच पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, अमोल गायकवाड, देवीदास वांढरे व दिनेश बास्टेवाड अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.






