पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेला विरोध करण्यासाठी सोमवारी रिक्षाचालकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. शहरातील विविध रिक्षा संघटनांनी एकत्र येत बंद पुकारला. तसेच परिवहन राज्यमंत्री आणि आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

खासगी दुचाकींचा वापर करून बाईक टॅक्सी व्यवसाय सुरू असल्याने रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. बेकायदेशीर सेवा बंद करून संबंधित कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच बाईक टॅक्सीविषयक धोरण रद्द करावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांना व्यवसाय मिळणे कठीण झाले असून, अनेकांना वाहनांचे हप्ते भरणेही अवघड जात असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. संबंधित कंपन्यांचे अॅप बंद करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासोबत कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये मंगळवारपासून रॅपिडोच्या बाईक टॅक्सीविरोधात कारवाई सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत बैठक घेण्याबाबतही चर्चा झाली.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. मात्र, आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुढील भूमिका ठरवली जाईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.






