मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रस्त्यांवरील खड्डे, धोकादायक वळणे, अपुरी वाहतूक चिन्हे आणि संरक्षक कठड्यांचा अभाव यामुळे या मार्गावर अपघातांचा धोका कायम असतो. आता हे अपघात रोखण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या उपक्रमामुळे रस्त्यावरील धोकादायक ठिकाणे ओळखून आवश्यक सुधारणा करणे शक्य होणार आहे.

या कामासाठी परिवहन विभागाने 18 लाख 40 हजार 800 रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. AI आधारित रस्ता सुरक्षा सर्वेक्षणाच्या माध्यमातून महामार्गाची सद्यस्थिती तपासली जाणार आहे. यामध्ये रस्त्यांची गुणवत्ता, अपघात होण्याची शक्यता असलेली ठिकाणे आणि वाहतूक सुरक्षेशी संबंधित सुविधांचे परीक्षण केले जाईल.
या सर्वेक्षणात केवळ रस्त्यांवरील खड्डे किंवा खराब भागांची माहिती गोळा केली जाणार नाही, तर वाहतूक चिन्हे स्पष्ट आहेत का, संरक्षक कठडे योग्य स्थितीत आहेत का आणि सुरक्षेच्या इतर सुविधा पुरेशा आहेत का, याचीही तपासणी होईल. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने या त्रुटींचे विश्लेषण करून त्यावर कोणत्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या जातील. या उपक्रमामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील रस्ता सुरक्षा सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.







