पुणे : सौंदर्य खुलविण्याचा दावा करणाऱ्या काही सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. कोंढवा खुर्द परिसरातील एका कॉस्मेटिक्स दुकानात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकून 7 लाख 30 हजार 262 रुपयांचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. आवश्यक परवाने आणि उत्पादनांवरील अनिवार्य माहिती नसतानाही ही उत्पादने विक्रीसाठी ठेवल्याचे तपासणीत आढळले.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाने ही कारवाई केली. 23 नोव्हेंबर रोजी औषध निरीक्षक श्रुतिका के. जाधव (राठोड) यांनी मीठानगर, कोंढवा खुर्द येथील ‘मायरा कॉस्मेटिक्स’ या दुकानाची तपासणी केली. यावेळी दुकानाचे प्रभारी मोहम्मद तौसीफ मंजूर शेख उपस्थित होते.
उत्पादनांवर आवश्यक माहितीच नव्हती

तपासणीदरम्यान दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या काही सौंदर्यप्रसाधनांवर उत्पादकाचे नाव, बॅच क्रमांक आणि उत्पादनाची तारीख यांसारखे महत्त्वाचे तपशील नमूद नसल्याचे दिसून आले. तसेच आवश्यक परवान्याशी संबंधित माहितीचाही अभाव असल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रशासनाने कारवाई केली. यामध्ये कोरियन ग्लास स्कीन नाइट क्रीम, क्लिनिकल नाइट व्हाइटनिंग फॉर्म्युला, 24 के गोल्ड क्रीम आणि अँटी हेअर फॉल हर्बल हेअर ऑईल या चार उत्पादनांचा समावेश आहे.
जप्त केलेल्या चार उत्पादनांचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. तपासणीचा अहवाल आणि पुढील चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.






