Daund News: दौंड : शेतात दिवसरात्र राबणाऱ्या शेतकऱ्याचा शेवट इतका भयाण असेल, असे कोणालाही वाटले नव्हते. दौंड तालुक्यातील पारगाव येथे दि. 22 फेब्रुवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. आपल्या उसाच्या शेतातील पाचट पेटवणे एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे. याचवेळी आगीच्या वेढ्यात अडकल्याने जालिंदर भालचंद्र भाडळे (69) या ज्येष्ठ शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जालिंदर भाडळे यांनी आपल्या शेतातील उसाची तोडणी पूर्ण झाल्यानंतर उरलेले पाचट जाळण्यासाठी आग लावली होती. शेत साफ करण्यासाठी शेतकरी ही पद्धत वापरतात. मात्र, त्या वेळी अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने आगीने वेगाने पसरायला सुरुवात केली. काही क्षणातच आगीने मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण शेत आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.
आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे भाडळे यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला नाही. आगीने त्यांना चारही बाजूंनी वेढले. त्यामुळे ते गंभीररीत्या भाजले गेले. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी केडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे पारगाव आणि परिसरात शोककळा पसरली असून, शेतकरी बांधवांनी दुःख व्यक्त केले आहे. शेतातील पाचट जाळताना काळजी घेण्याची गरज असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.





