लोणी काळभोर, ता. 23 : इंस्टाग्रामवर ओळख वाढवून सुरवातीला मैत्री केली. मैत्री झाल्यानंतर महागडा मोबाईल पाठवण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची तब्बल 11 लाख 51 हजार 900 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलोनी बापू अरवडे (वय 26, रा. कवडीपाठ टोलनाका, ता. हवेली) या शिक्षण पूर्ण करून संगणक प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. 5 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवर ‘विकास शर्मा’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. सुरुवातीला साध्या गप्पांमधून ओळख वाढवत त्याने विश्वास संपादन केला. काही दिवसांनी त्याने स्वतःला यूकेमध्ये रेस्टॉरंट व्यवसाय करणारा भारतीय असल्याचे सांगितले आणि मैत्रीच्या नावाखाली तरुणीला ‘आयफोन 17 प्रो मॅक्स’ भेट देणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर पार्सल पाठवले असल्याचा बहाणा करत मुंबई विमानतळ कस्टम अधिकारी असल्याचे सांगत दुसऱ्या व्यक्तीकडून तरुणीला फोन आला. कस्टम शुल्क, एक्स्चेंज फी, परमिशन लेटर, इनकम टॅक्स, कॅश शो मनी अशा वेगवेगळ्या कारणांनी त्या तरुणीकडून वारंवार पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. इतकेच नव्हे तर स्वतःला सीबीआय अधिकारी आणि आरबीआय मॅनेजर असल्याचे सांगत आरोपींनी तिच्या करिअर संपवण्याचा व कुटुंबावर कारवाई करण्याची धमकी दिली. या भीतीमुळे तरुणीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आणि युपीआय आयडीवर पैसे पाठवले.
दरम्यान, 13 ते15 डिसेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी सलोनी बापू अरवडे यांच्याकडून एकूण 11 लाख 51 हजार 900 रुपये उकळले. नंतर संशय आल्यावर तिने पैसे परत मागितले असता आरोपींनी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C), 66(D) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 340(2), 351, 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






