Mumbai-Pune Missing Link : पुणे : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती (Pune-Mumbai Expressway) मार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link Project) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा मार्ग येत्या 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. तसेच घाट परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहे. या अंतर्गत तयार करण्यात आलेला नवीन बोगदा 10 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा आहे. हा बोगदा सुरू झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 25 मिनिटांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
बोगद्यातून या वाहनांना बंदी
मात्र, या बोगद्यातून सर्व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव ज्वलनशील इंधन, धोकादायक रसायने आणि अतिज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकरना या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या नियमांनुसार या बोगद्याला विशेष वर्गवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अशा वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. दररोज सुमारे 2000 इंधन टँकर या मार्गावरून प्रवास करतात, त्यामुळे या वाहनचालकांना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.
या बोगद्यात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था बसवण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर आधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. तसेच इंधन गळती टाळण्यासाठी विशेष व्यवस्था आणि अग्निरोधक सुविधा देण्यात आली आहे.
हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीचा होणार असून, मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे.



