लोणी काळभोर, ता. 18: नागरिकांनो, विवाह सोहळ्याला जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. नाहीतर तुम्हालाही पश्चाताप करण्याची वेळ येईल. मागील आठ दिवसापूर्वी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका विवाह सोहळ्यात नवरीचे स्त्रीधन म्हणून केलेले सुमारे साडे सात लाखांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. (Pune Latest Crime News) ही घटना ताजी असतानाच, आता कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्स या मंगल कार्यालयात दोन पुरुषांच्या गळ्यातील अडीज तोळे वाजण्याच्या सोन्याच्या चैन चोरून नेल्याची घटना रविवारी (ता.16) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे कुंजीरवाडी परिसरात लग्नसराईत सोन्याचे दागिने चोरणारी टोळी सक्रीय असल्याचे दिसून येत आहे.

सुभाष किसन हगवणे (वय 65, रा. मु.पो. नायगाव ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष हगवणे हे कुंजीरवाडी येथील एका विवाहसोहळ्याला कुटुंबासोबत आले होते. हगवणे हे लग्न लागल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी चालले होते.
दरम्यान, स्पीकरवर पुकारण्यात आले की, लग्नासाठी आलेले बाळासाहेब सुदाम पवार यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन पडली आहे. कोणास सापडली असेल तर माईकच्या जवळ आणून द्यावे. असे सांगण्यात आले. है ऐकल्यानंतर हगवणे यांनीसुद्धा त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन पाहिली. परंतु, त्यांना मिळून आली नाही. त्यांनतर सर्वांनी मिळून परिसरात शोध घेतला परंतु, सोन्याच्या चैन कोठेही मिळून आल्या नाहीत.
कोणीतरी अज्ञात चोरट्याने हगवणे यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम म्हणजे 1 लाख 63 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व पवार यांच्या गळ्यातील चालू बाजार भावाप्रमाणे 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची एक तोळ्याची सोन्याची चोरून नेली आहे. असा सुमारे पावणे तीन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अशी फिर्याद हगवणे यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अण्णा माने करत आहेत.
विवाह सोहळ्यात नेमकं काय होते…
लग्नासाठी अनेक पाहुणे मंगल कार्यालयात दाखल होत असतात. प्रत्येकजण याठिकाणी आपल्या सुबत्तेचे दर्शन इतरांना घडविण्यासाठी सक्रिय असतो. सोबत आणलेले सोन्याचे दागिने व इतर ऐवज सोबतच्या पर्स, बॅगमध्ये ठेवत ते सर्वत्र फिरत असतात. नातेवाईक, पाहूणे, आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीदरम्यान अशा पर्स, बॅगा इतरत्र ठेवल्या जातात. अशा पर्स आणि बॅगा हेरत चोरटे त्या लंपास करतात.
विवाह सोहळ्यात चोरट्यांपासून सावधान
विवाह सोहळ्यात चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा, गर्दीत अनोळखी लोकांपासून सावध राहा आणि सोहळ्यातील सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष द्या. चोर लग्नसोहळ्यात पाहुणे बनून येतात आणि गर्दीचा फायदा घेऊन रोख रक्कम किंवा मौल्यवान दागिन्यांची चोरी करतात, त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.






