प्रयागराज: उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये एका (Prayagraj News) धक्कादायक हत्याकांडाचा (Crime News) उलगडा करत पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे. प्रयागराजच्या बारा पोलीस स्टेशन परिसरातील एका घरात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. जमिनीवर रक्ताने लिहिलेले वाक्य “मी वेडी होते, माझा नवरा निर्दोष आहे” या कारणामुळे सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. (Breaking News)

गेल्या शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) बारा पोलीस स्टेशन परिसरात एका घरात सुषमा नावाच्या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला आढळला. तिच्या मानेवर चाकूने वार करण्यात आले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जमिनीवर तिच्याच रक्ताने ‘मी वेडी होते, माझा नवरा निर्दोष आहे’ अशी सुसाईड नोट लिहिलेली होती. मृत महिलेचा नवरा रोहित द्विवेदी पोलिसांसमोर मोठ्याने रडत होता आणि पत्नीच्या मृतदेहाला मिठी मारत होता.
नवऱ्याचे हे नाटक पाहून पोलिसांनी सुरुवातीला ही आत्महत्या असावी, असा अंदाज लावला. तरीही, पोलिसांनी तपास सुरू केला आणि याच दरम्यान त्यांना रोहितवर संशय आला. पोलिसांनी रोहितला पोलीस ठाण्यात बोलावून कसून चौकशी केली, तेव्हा त्याने सर्व काही कबूल केले. त्याने सांगितलं की, त्यानेच आपल्या पत्नीची हत्या केली आणि कोणीही आपल्यावर संशय घेऊ नये म्हणून त्याने पत्नीच्या रक्ताने जमिनीवर ती सुसाईड नोट लिहिली.
२०२० मध्ये रोहित आणि सुषमाचे लग्न झाले होते, परंतु त्यांना मूल होत नव्हते. याच कारणामुळे त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. दरम्यान, रोहितचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते. सुषमाला हे कळताच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. याच मुद्द्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात रोहितने सुषमाच्या मानेवर चाकूने वार केले, ज्यामुळे अतिरक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला.
हत्येनंतर, रोहितने घाबरून मागच्या दाराने कामावर जाण्याचा बनाव केला. काही तासांनी त्याने मृत पत्नीला अनेक वेळा फोन केला आणि तिने फोन न उचलल्याने घरमालकाला माहिती दिली. दार उघडल्यावर मृतदेह आणि रक्ताने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना आढळली. मात्र, एवढे सगळे करूनही आरोपी पतीचा बनाव अखेर उघडकीस आला.







