सोलापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या (Anagar Nagar Panchayat) नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज (१८ नोव्हेंबर) मोठा राजकीय बदल (Prajakta Patil Anagar) झाला आहे. या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज (Anagar News) दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे. (Breaking News)

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नव्हती. यासह, अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतलेल्या आक्षेपांमध्ये थिटे यांचा मतदान यादीतील प्रभाग क्रमांक, अनुक्रमांक आणि वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नव्हता. म्हणूनच , महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम १९६६ नुसार थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला.
थिटे यांच्या उमेदवारीमुळे १७ नगरसेवक बिनविरोध होऊनही नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती. नगराध्यक्षपदासाठी केवळ तीनच अर्ज आले होते. त्यामध्ये भाजपच्या प्राजक्ता पाटील, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांचा समावेश होता.
आता थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात प्राजक्ता पाटील आणि अपक्ष सरस्वती शिंदे या दोनच उमेदवार उरल्या आहेत. त्यामुळे, अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर शिंदे यांनी अर्ज मागे घेतला, तर माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे, प्राजक्ता पाटील यांच्या राजकीय वाटचालीस महत्त्वपूर्ण वळण मिळालं आहे.






