उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन परिसरात भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात सादर न केल्याप्रकरणी कांचन वृंदावन सोसायटीतील तीन घरमालकांविरुद्ध उरुळी कांचन पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहशतवादविरोधी शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान ही बाब समोर आली.

याप्रकरणी ए विंगमधील फ्लॅट क्रमांक 303 चे मालक चेतन सुभाष बहिरट (वय 40, रा. डिपी रोड हडपसर), बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 307 च्या मालकीण सुनिता गोपाल सिंग वय 62 वर्ष रा सुखसागर नगर अंबामाता मंदिर पुणे), बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 306 चे मालक अमोल आर चौधरी (वय 43, रा. उरूळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी दहशतवादविरोधी शाखेतील पोलिस कॉन्स्टेबल नितीन धनाजी जाधव यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी उरुळी कांचन परिसरात परप्रांतीय नागरिक तसेच बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात शोधमोहीम राबविण्यात येत होती. तसेच भाडेकरूंची विहित नमुन्यातील सविस्तर माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात न देणाऱ्या घरमालकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान कोरेगाव मूळ येथील कांचन वृंदावन सोसायटीत तपासणी करण्यात आली.

त्यावेळी ए विंगमधील चेतन बहिरट, बी विंगमधील सुनीता सिंग आणि बी विंगमधील अमोल चौधरी यांनी आपल्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात सादर केली नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. या तिन्ही घरमालकांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 28 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अन्वये काढलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात ग स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणांचा पुढील तपास पोलिस हवालदार निलेश जाधव, कमलेश होले आणि प्रविण चौधर करीत आहेत.







