पुणे : पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनादरम्यान आवश्यक परवानगी न घेता ड्रोन उडवल्याचा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह 5 जणांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रमोद पाटील, दिगंबर खाडे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांचाही समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनाच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आले होते. मात्र, यासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप आहे. या प्रकाराची दखल घेत विश्रामबाग पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, एस. एम. जोशी पुलावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी यापूर्वी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलन स्थगित करण्याबाबत पत्र दिल्यानंतरही संबंधितांनी अचानक आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले.

या प्रकरणातील आरोपींच्या यादीत प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण महादेव पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियंका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभूळकर आणि साहेबराव क्षीरसागर यांची नावे आहेत.
पोलिसांच्या आरोपानुसार, आंदोलनामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबरदरम्यान लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस करत असून, पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






