पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुणे विभागात मोठी कारवाई करत बारामती एमआयडीसी डेपोचे वाहतूक नियंत्रक आणि एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालक अनिल तुकाराम बनकर (वय 51) यांना 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6.19 वाजता बारामती एसटी स्थानकासमोरील रस्त्यावर करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका कंत्राटदाराने 20 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेच्या इमारतीतील फर्निचर नूतनीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे एकूण बिल 48,60,455 रुपये झाले होते. त्यापैकी 40 लाख रुपये मिळाले होते, मात्र उर्वरित 8,60,455 रुपये आणि इतर कामांचे 4,98,000 रुपये अद्याप मिळाले नव्हते.

तक्रारीनुसार, ही थकीत रक्कम मंजूर करून देण्यासाठी आरोपी अनिल बनकर यांनी सुरुवातीला 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. पडताळणीदरम्यान ही मागणी 6 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तडजोड करून पहिल्या टप्प्यात 4 लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले, तर उर्वरित 2 लाख रुपये पुढील बिल मंजूर झाल्यानंतर घेण्याचे निश्चित करण्यात आले.
तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर ACB ने सापळा रचला. बारामती एसटी स्थानकासमोरील परिसरात चारचाकी वाहनात आरोपीने तक्रारदाराकडून 4 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच ACB च्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACB ने केले आहे.






