लोणी काळभोर, ता. 23 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर, ट्रक व क्रुझर गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्वामी मंदिराजवळ आज शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा अपघात सोलापूर कडून पुण्याच्या दिशेकडे जाताना रस्त्यावर झालेला आहे.

या अपघातात ट्रकचालक जखमी होऊन ट्रक मध्ये दोन तास अडकला होता. कुंजीरवाडी चे माजी सरपंच सचिन तुपे, त्यांचे सहकारी, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस व वाहतूक वाहतूक पोलिसांनी अथक प्रयत्न करून क्रेनच्या सहाय्याने जखमी चालकाला बाहेर काढले. आणि त्वरित लोणी काळभोर येथील एका बड्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, मृत्यू झालेल्या चालकाचे नाव व पत्ता समजू शकलेला नाही. परंतु, अपघात झाल्यानंतर पुणे सोलापूर महामार्गावर दोन तासाहून अधिक प्रचंड वाहतूक कोंडी होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवून महामार्ग मोकळा केला. लोणी काळभोर पोलिसांनी अपघातातील वाहने ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.






