इम्रान अत्तार भोर

भोर: आर्थिक वर्षाच्या अखेरीसही कर थकबाकी न (Bhor News) भरल्यामुळे भोर नगरपालिकेने आता कडक भूमिका घेतली आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणावर थकबाकी राहिल्याने पालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून शहरातील विविध चौकांमध्ये थकबाकीदारांची नावे असलेले बॅनर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील एकूण 17 ठिकाणी असे बॅनर लावण्यात आले असून त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर शहरातील प्रत्येक प्रभागातील कर थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित प्रभागातील प्रमुख चौकांमध्ये थकबाकीदारांची नावे असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस उरले असतानाही अनेक मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरलेली नाही. यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने वारंवार आवाहन करून नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने ही कठोर पद्धत अवलंबल्याचे सांगितले जात आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, सध्या शहरातून सुमारे 2.5 कोटी रुपये कर वसूल झाला आहे, तर अद्याप जवळपास 3.5 कोटी रुपयांची थकबाकी बाकी आहे. त्यामुळे कर वसुली वाढवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने थेट सार्वजनिक ठिकाणी थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याचा मार्ग निवडला आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांतही संबंधित नागरिकांनी थकबाकी भरली नाही तर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यासोबतच त्यांचे पाणीपुरवठा नळ कनेक्शन तोडण्याचीही तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तातडीने थकीत कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.







