भोर: भोर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Bhor Municipality Reservation) पार्श्वभूमीवर आज नगरपरिषदेच्या 10 प्रभागांतील आरक्षण सोडत जाहीर झाली. यावेळी 20 नगरसेवक पदांच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली असून, काही विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाल्याने त्यांचे राजकीय गणित पुन्हा सुलभ झाले आहे. तर काहींना नव्या आरक्षणामुळे अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

ही आरक्षण सोडत श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृहात, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी मुख्याधिकारी गजानन शिंदे, शाखा अभियंता खरात, सुमंत शेटे, संदीप शेटे, गणेश पवार, अमित सागळे, पल्लवी फडणीस, केदार देशपांडे, जगदीश किर्वे, सचिन मांडके, सचिन तारू, अतुल काकडे, सोमनाथ ढवळे, उमेश देशमुख, शुभम शेटे, राजेश शिंदे, समीर सागळे, तोसिफ अत्तार, अनुप धोत्रे, तुषार घोडेकर, कुणाल धुमाळ, स्वामी धुमाळ, सचिन कन्हेरकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

भोर नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 नगरसेवक, असे एकूण 20 जागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामध्ये 2 जागा अनुसूचित जाती-जमातींसाठी (1 महिला, 1 पुरुष), 5 जागा नागरिकांच्या मागासवर्गासाठी (त्यात 3 महिला), 6 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव, 7 जागा सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी सुटल्या आहेत
प्रभागानुसार आरक्षण :
1. प्रभाग क्र. 1 – सर्वसाधारण (खुला) – 1 , सर्वसाधारण महिला – 1
2. प्रभाग क्र. 2 – सर्वसाधारण (खुला) – 1, सर्वसाधारण महिला – 1
3. प्रभाग क्र. 3 – सर्वसाधारण (खुला) – 1, सर्वसाधारण महिला – 1
4. प्रभाग क्र. 4 – मागासवर्ग – 1, सर्वसाधारण महिला – 1
5. प्रभाग क्र. 5 – सर्वसाधारण (खुला) – 1, अनुसूचित जाती महिला – 1
6. प्रभाग क्र. 6 – अनुसूचित जाती (खुला) – 1, सर्वसाधारण महिला – 1
7. प्रभाग क्र. 7 – मागासवर्ग – 1, सर्वसाधारण महिला – 1
8. प्रभाग क्र. 8 – सर्वसाधारण (खुला) – 1, मागासवर्ग महिला – 1
9. प्रभाग क्र. 9 – सर्वसाधारण (खुला) – 1, मागासवर्ग महिला – 1
10. प्रभाग क्र. 10 – सर्वसाधारण (खुला) – 1, मागासवर्ग महिला – 1
राजकीय समीकरणे :
आरक्षणामुळे काही विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग खुल्या वर्गात किंवा महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना निवडणुकीतून बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, समीर सागळे, आशा रोमन, अनिल पवार हे तिघेही प्रभाग क्र. 8 मध्ये एकत्र आले असल्यामुळे या ठिकाणी तिकीटासाठी तीव्र चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
चौरंगी लढतीची शक्यता:
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या प्रमुख पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भोर नगरपालिकेच्या लढतीत चौरंगी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.







