Bhor : भोर : भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, तालुक्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. या निवडणुकीत 9 थेट सरपंच पदे आणि 34 सदस्य पदांसह एकूण 43 जागांसाठी मतदान होणार आहे. 7 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी पहिल्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे सध्या बाहेरून शांतता दिसत असली तरी पडद्यामागे मात्र राजकीय हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे.
आपटी, करंदी खुर्द, कोळवडी, खडकी, परहर बुद्रुक, रावडी, शिरवली, सोनवडी आणि वाढाणे या 9 ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. या ठिकाणी चुरशीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट आणि निवासी नायब तहसीलदार अरुण कदम यांनी निवडणूक तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. अंगसुळे, आंबेघर, करंजे, कांबरे, कासुर्डी, कुंबळे, कोर्ले, तेलवडी, बसरापूर, म्हाकोशी, वडतुंबी, वारखंड, सांगवी, साळव यांसह अनेक गावांमध्ये ही निवडणूक होणार आहे.
अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मागील निवडणुकांचे निकाल लक्षात घेऊन विविध पक्ष आणि स्थानिक नेते उमेदवार ठरवण्यासाठी बैठकांचे आयोजन करत आहेत. सुरुवातीला अर्ज दाखल न झाल्याने शांतता दिसत असली तरी शेवटच्या दिवसांत अर्जांची संख्या वाढेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल असून, छाननी 15 एप्रिलला होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 17 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर चिन्ह वाटप होईल. मतदान 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार असून, निकाल 29 एप्रिलला जाहीर केला जाणार आहे.







